अर्जुनाच्या निमित्ताने भगवंतांनी सांगितलेल्या 'गीते'त सर्व जगाचा उद्धार झाला. भगवंतांनी 'गीता' प्रगट करून जगातील सर्व लोकांच्या शिरा वरील सांसारओझे दूर केले. धन्य ते पवित्र कुळ कि ज्यात जन्माला आलेला पार्थ अशा ज्ञानाचा अधिकारी झाला. त्याच्यासाठी निर्माण झालेल्या गीताशास्त्र हे सर्व जगाचे रक्षणकर्ते झाले.
नामधारकांनी सिद्धांपाशी श्रीगुरुचरित्रश्रवणाची इच्छा दर्शविली, त्यांना विनंती केली. नामधारकाच्या निमित्ताने सिद्धांनी म्हणजे प्रत्यक्ष श्रीगुरुंनी स्वमुखाने सांगितलेल्या श्रीगुरुचारीत्राने व नामधारकाने त्याच्या केलेल्या विस्ताराने सर्व जगाचा महालाभ झाला. सर्वांना हे गुरुचरित्र उद्धारक झाले आहे. पार्थाप्रमाणेच नामधारक व त्याचे कुलही धन्य. म्हणूनच नामधारकाने सुरवातीला पूर्वजांची पुंण्यायी पणाला लावली आहे.
भगवंतांनी पार्थाला सांगितलेल्या 'गीते'चे ज्ञानेश्वरांनी केलेले वर्णन श्रीगुरूचरित्रालाही अनुरूप आहे असे मला वाटते.
"परी वत्साचेनी वोरसें | दुभते होय घरोद्धेशे | जालें पांडवांचेनी मिषें | जगदुद्धरण || चातकाचिये कणवे | मेघु पाणीयेसी धावे | तेथ चारचार आघवे | निवालें जेवीं || कां अनन्यगतीकमळा | लागी सूर्य ये वेळोवेळा |कि सुखय होईजे डोळा | त्रिभुवनींचा || तैसे अर्जुनाचेनि व्याजे | गीता प्रकाशुनी श्रीराजे | संसारएवढे थोर ओझे | फेडिले जगाचे || बाप कुळ ते पवित्र | जेथींचा पार्थु या ज्ञान पात्र | जेणे गीता केले स्वतंत्र | आवारु जगा || (ज्ञा. अ. १८. १४६७- १४७०; १८. १४७२)
श्रवण करणारा अर्जुन शेवटी स्वातमानंदात विरून जाण्याचा संभव आहे असे पाहून भगवंतांनी त्याला प्रश्न विचारण्याच्या निमित्ताने देहभानावर आणला. भगवंतांनी त्याच्याकडून पुढील कार्यभाग साधावयाचा असल्याने त्यांनी तसे होऊ दिले नाही. पूर्णब्रह्म जाला पार्थु | तरी पुढील साधावया कार्यार्थु | मर्यादा श्रीकृष्णनाथू | उल्लंघों नेदी ||
सिद्धांकडून श्रीगुरूचरित्र ऐकल्यावर नामधारकांची स्थिती अर्जुनासारखी झाली. "समाधीसुखे न बोले | देह अणुमात्र न हाले | अशी त्याची स्थिती झाली. सर्व ज्ञान त्याच्याजवळच राहिले तर दुसर्यांना ते कळणार कसे, म्हणून सिद्धांनी त्याला भानावर आणले. " देखोनि सिद्ध सुखावती | समाधी लागली यासी म्हणती | सावध करावा मागुती | लोकोपकाराकारणे || देहावरी ये ये म्हणती | ऐक बाळा शिष्योत्तमा | तू तरलासी भवसागरी | राहासी ऐसा समाधिस्थ जरी | ज्ञान राहील तुझ्या उदरी | लोक तरती कैसे मग || बाह्य देहाची रहाटणी | शास्त्राधारे करावी || मग तो नेत्रोन्मीलन करी | कर जोडोनि उभा ठाके ||" अर्जुनासारखाच नामधारकाचा अनुभव होता. दोघांनीही ' श्रीमुखांतून' निघालेले बोल ऐकले होते.
अध्याय ३ मध्ये सिद्ध नामधारकाला म्हणतात, " हिंडत आलों सकळ क्षिति | नव्हे कवणा ऐशी मति | गुरुचरित्र न पुसती | तूंते देखिले आजि आम्हीं || तू भक्त केवळ श्रीगुरूचा | म्हणोनि बुद्धि झाली उंचा ||
श्रीकृष्ण भगवान अर्जुनालाही असेच म्हणतात. " पै अर्जुना आम्हाही वाडेंकोडे | अखंड बोलों आवडे | तरी काय कीजे न जोडे | पुसते ऐसे || आजि मनोरथांसी फळ | जोडलासी तू केवळ | जे तोंड भरूनि निखळ | आलासि पुसो ||
सिद्ध नामधारकाला म्हणतात : तुवा केले उपकारासी | संतुष्ट झालो मानसी | पुत्रपौत्री तूं नांदसी | दैन्य नहीं तुझे घरी || ( अध्याय १६.७ ) त्याचप्रमाणे भगवान अर्जुनाला म्हणतात : " यया बोला विश्वेशे | म्हणितलें तोषे बहुवसे | एयेविषयी धरणें बैसे | ऐसे कें जोड़े || तरी अर्जुना निरूपिजेल | तें कीर भाषेआंतुल | परी मेचु ये होईजेल | ऋणीया तुज || (ज्ञानेश्वरी १८.३००-३०१) भगवान श्रीकृष्णानी अर्जुनाशी बोलताना जी भाषा वापरली त्याच अर्थाची भाषा सिद्धानी नामधारकाशी बोलताना वापरली आहे.
संजयला दिव्य दृष्टी मिळाल्याकारणाने कुरुक्षेत्रावर घडलेल्या सर्व हकीकतीचे वर्णन संजयने धृतराष्ट्रापाशी केले, त्याचप्रमाणे सरस्वती गंगाधर स्वतः
कर्नाटकी- कानडी असताही व त्यांची मातृभाषा मराठी नसताही , श्रीगुरुकृपेने त्यांनी उत्तम मराठी भाषेतूनच प्रासादिक 'श्रीगुरुचरित्र ' लिहिले व त्याचा आपणा सर्वांस लाभ मिळून आपल्याला आत्माकल्याणाचा मार्ग त्यांनी दाखविला . " भाषा न ये महाराष्ट्र " "शब्द व्युप्तत्तीही नेणे | " " महाराष्ट्र भाषे करुनी टीका | सांगतसे सरस्वती गंगाधर | " असे ते स्वतः म्हणतात.
No comments:
Post a Comment